Advertisement Advertisement

“डिझेल नाय तर पेरणी नाय! हातात कॅन घेऊन शेतकरी संघटना तहसीलवर धडकला…

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज) खरीप हंगाम अगदी तोंडावर आलेला असतानाच जिल्ह्यात खतांसोबत डिझेलचाही मोठा तुटवडा निर्माण झाल्यानं शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. मशागतीची कामं रखडल्यामुळे संतप्त झालेल्या जिल्हा शेतकरी संघटनेनं “वेळेवर डिझेल मिळालं नाही तर यंदा पेरणीच करणार नाही,” असा थेट इशारा सरकारला दिला आहे.

सोमवारी (दि.१८ मे) जिल्हाध्यक्ष देवीदास कणखर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हातात डिझेलचे कॅन घेत तहसील कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली. तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना निवेदनही देण्यात आलं.

शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, आता शेती पूर्णपणे यांत्रिक झाली असून ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्रांसाठी मोठ्या प्रमाणावर डिझेल लागतं. पण पेट्रोलपंपांवर डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः हेलपाटे मारावे लागत आहेत. ट्रॅक्टर शेतातून पंपावर नेण्यात वेळ आणि खर्च दोन्ही वाढत असल्याने कॅनमध्ये डिझेल देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेने केली.

यावेळी शेतकरी संघटनेने पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल आणि बायोडिझेल उपलब्ध करून देण्याचीही मागणी केली. ऊसापासून इथेनॉल आणि इतर जैविक स्रोतांपासून बायोडिझेल तयार होऊ शकत असल्याने शेतकऱ्यांना कमी खर्चात इंधन मिळेल आणि देशाची आयातही कमी होईल, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.

“रासायनिक खतांप्रमाणे इंधनावरही अनुदान द्या, अन्यथा शेती करणं कठीण होईल,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या मोर्चात देवीदास कणखर, एकनाथ पाटील, भीका पाटील, खुशालराव पाटील, अच्युतराव पाटील, गणेश थुट्टे, मुरलीधर येवले, दिनकर घुबे, राजू शेटे, प्रकाश घुबे, भागवत थुट्टे, गजानन घुबे, दीपक घुबे, परमेश्वर घुबे, रामेश्वर अंभोरे, भागवत नरवाडे, आत्माराम गाडे, संतोष शेळके, रामदास शेळके, श्रीधर थुट्टे, शरद थुट्टे, संदीप थुट्टे, श्रीकृष्ण थुट्टे, सागर कव्हळे, संतोष शेरे, समाधान थुट्टे, केशव थुट्टे   यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!