मेरा खुर्द (बुलडाणा कव्हरेज न्युज): लग्नाचे वय होऊनही सोयरीक जुळत नसल्याच्या नैराश्यातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची हळहळजनक घटना अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील मंगरुळ येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मंगरुळ येथील रहिवासी सत्यपाल साहेबराव भिसे याचे लग्न जुळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून कुटुंबीय प्रयत्न करत होते. मात्र सोयरीक जुळत नसल्याने तो मानसिक तणावाखाली होता. त्यात चांगले शिक्षण असूनही नोकरी किंवा स्थिर कामधंदा मिळत नसल्याने त्याच्या नैराश्यात भर पडत होती.
मित्रांची लग्नं होत असताना आपले लग्न जमत नसल्याची खंत त्याला सतावत होती. त्यामुळे तो अनेक दिवसांपासून एकटाच राहू लागला होता. घराबाहेर कमी पडणे, अबोल राहणे आणि दारूचे व्यसन जडल्याने त्याची मानसिक स्थिती अधिक खालावत गेल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, सत्यपाल शेतात गेल्यानंतर बराच वेळ घरी परतला नाही. कुटुंबीयांनी शोध घेतला असता, मंगरुळ शिवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
याप्रकरणी साहेबराव सिताराम भिसे (वय ७५) यांच्या फिर्यादीवरून अंढेरा पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.













