Advertisement Advertisement

शेंदुर्जनमध्ये गोठ्याला भीषण आग; चार म्हशी होरपळल्या, १५ म्हशी व दोन बैलांचे….

शेंदुर्जन (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेंदुर्जन येथे गुरुवार, २९ मे रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास एका गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत चार म्हशी होरपळून जखमी झाल्या असून, ग्रामस्थांनी तत्परता दाखवत १५ म्हशी व दोन बैलांना गोठ्यातून बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पभूधारक शेतकरी अनिल तेजराव शिंगणे यांच्या गट क्रमांक ५८६ मधील शेतात रस्त्यालगत गुरांचा गोठा आहे. गोठ्यात १९ म्हशी आणि दोन बैल बांधलेले असताना अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले.

यावेळी माजी सरपंच दामोदर शिंगणे, राजेश जाधव, श्रीराम रणमळे, आदित्य रणमळे, हरिभाऊ खंडागळे, तसेच शेतकरी अनिल शिंगणे, वैभव शिंगणे आणि अन्य ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता गोठ्यात अडकलेल्या जनावरांना बाहेर काढले. त्यांच्या धाडसी प्रयत्नांमुळे दोन बैल व १५ म्हशी सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

मात्र, आगीच्या झळांमुळे चार म्हशी होरपळून जखमी झाल्या. तसेच गोठ्यालगत असलेली २० ते २५ फूट उंचीची झाडे जळून खाक झाली. याशिवाय गोठ्याजवळ ठेवलेले सुमारे ६० स्प्रिंकलर पाइप आणि शेतीसाठी वापरण्यात येणारी अवजारेही आगीत जळून नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी विजयकुमार शिलवंत व गजानन मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी रुपराव शिंगणे, साहेबराव शिंगणे आणि परमेश्वर शिंगणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

या आगीत नेमके किती आर्थिक नुकसान झाले याचा अंदाज महसूल प्रशासनाकडून घेतला जात असून, घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!