खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच नवविवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून जबरदस्तीने गोळ्या देत गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार खामगाव शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित विवाहितेचे नाव सालिया अंजूम शेख शहनवाज (वय १९) असे आहे. तिचा विवाह २५ जानेवारी २०२६ रोजी शेख शहनवाज शेख सलीम याच्यासोबत झाला होता. तक्रारीनुसार, विवाहानंतर पती, सासू फरजानाबी, नणंद शबनमबी व शगुफ्ताबी यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. वारंवार टोमणे मारणे, अपमान करणे, शिवीगाळ व मारहाण केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, पीडिता गर्भवती असताना तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने गोळ्या देऊन गर्भपात घडवून आणल्याचेही तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर १३ एप्रिल २०२६ रोजी मारहाण करून तिला घराबाहेर काढण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी पतीसह चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५(२), ३(५), ३५१(२), ३५२ व ८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जावेद जाफर शेख करीत आहेत.












