Advertisement Advertisement

देऊळघाटात सख्ख्या भावाचा भावावर सुऱ्याने जीवघेणा हल्ला; मानेवर-पाठीवर ५ सपासप वार, आरोपी फरार….

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : शहरापासून काही अंतरावर असलेल्या देऊळघाट येथे क्षुल्लक घरगुती वादाचे पर्यावसान रक्तरंजित हल्ल्यात झाले. सख्ख्या भावानेच धारदार शस्त्राने आपल्या भावावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी (२८ जून) सायंकाळी सुमारे ५ वाजता घडली. या हल्ल्यात शेख मोहसीन गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपी शेख मोईन गावातून फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख मोईन आणि त्याचा भाऊ शेख मोहसीन यांच्यात मागील काही दिवसांपासून क्षुल्लक कारणावरून वाद सुरू होता. रविवारी सायंकाळी घरगुती कारणावरून पुन्हा दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात शेख मोईनने धारदार सुऱ्याने मोहसीनच्या मानेवर व पाठीवर सलग चार ते पाच वार केले. या हल्ल्यात मोहसीन गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला.

घटनेनंतर नातेवाइकांनी जखमी मोहसीनला तातडीने बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाली. सख्ख्या भावानेच क्षुल्लक वादातून भावावर जीवघेणा हल्ला केल्याने देऊळघाट परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!