चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : चिखली तालुक्यातील बोरगाव काकडे येथे एका ३२ वर्षीय विवाहित महिलेचा दुचाकीवरून पाठलाग करून विनयभंग करत शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच “माझ्यासोबत आली नाहीस तर तुझे फोटो इंस्टाग्राम व व्हॉट्सअॅपवर व्हायरल करीन,” अशी धमकी देत महिलेसह तिच्या पतीलाही जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अमडापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव काकडे येथील पीडित महिला २० मे रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास काही कामानिमित्त जात असताना गावातील आरोपी याने मोटारसायकलवरून तिचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर निर्जनस्थळी आरोपीने दुचाकी थांबवून महिलेजवळ जात तिचा विनयभंग केला व शरीरसुखाची मागणी केली.
महिलेने विरोध केल्यानंतर आरोपीने तिच्याकडे फोटो असल्याचे सांगत ते सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच अश्लील शिवीगाळ करत “कुणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या पतीला चाकूने मारून टाकीन,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून अमडापूर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५(१), ७८, ३५१(२), ३५२ व २९६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण टेकाळे करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.












