बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा शहरातील ज्येष्ठ पत्रकार दिगंबर कंकाळ यांचा मुलगा मंगेश कंकाळ (वय २५) याचा २७ मेच्या रात्री दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. लग्नाला अवघे २७ दिवस झाले असतानाच संसाराची स्वप्ने अधुरी राहिल्याने कंकाळ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा शहरालगतच्या सुंदरखेड येथील तार कॉलनीमध्ये राहणाऱ्या पत्रकार दिगंबर कंकाळ यांच्या मुलगा मंगेशचा विवाह १ मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर नवदाम्पत्याने नव्या आयुष्याची स्वप्ने रंगविली होती. मात्र नियतीने काळाचा घाला घालत मंगेशला कुटुंबीयांपासून कायमचे हिरावून घेतले.
मंगेश कंकाळ हा मित्रांसोबत धाड परिसरात एका लग्नसमारंभासाठी गेला होता. तेथून २७ मे रोजी रात्री सुमारे ११ ते ११.३० वाजेच्या दरम्यान तो दोन मित्रांसह दुचाकीने (क्रमांक एमएच-२८-बीटी-२०८०) बुलढाण्याकडे परत निघाला होता. नांद्राकोळी मार्गावरील सागवन शिवारात त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.
या भीषण घटनेत मंगेश कंकाळ याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला एक मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणखी एका मित्राला किरकोळ दुखापत झाली आहे.
दरम्यान, अपघातानंतर दुचाकीची पाहणी केली असता वाहनाचे फारसे नुकसान दिसून आले नसल्याने हा केवळ अपघात नसून घातपात असू शकतो, असा संशय मंगेशचे वडील पत्रकार दिगंबर कंकाळ यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली असून यासंदर्भात पोलिसांत तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.













