मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मलकापूर शहरातील सालीपुरा नाका परिसरात किरकोळ वादातून काठी चालल्याची घटना घडली. “तू इथे काय करतो?” एवढं विचारताच वाद पेटला आणि रसवंती चालकावर थेट काठीने हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका इसमाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गजानन नारायण भोजणे हे १९ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सालीपुरा नाका येथे आपली फिरती रसवंती गाडी उभी करून सामान आत ठेवत होते. त्यावेळी आरोपी संजय शांताराम पाटील (वय ५०, रा. दुर्गा नगर) हा गाडीतील सामानाजवळ वावरताना दिसला.
यावेळी भोजणे यांनी “तू इथे काय करतो?” असा जाब विचारताच आरोपी संतापला. आधी शिवीगाळ झाली आणि त्यानंतर आरोपीने हातातील काठीने फिर्यादीच्या पाठीमागून हल्ला करत मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात भोजणे जखमी झाले.
या घटनेनंतर मलकापूर शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध अप.क्र. २९३/२०२६ अन्वये कलम ११८(१), ३५२ बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. सुपेश झाल्टे करीत आहेत.













