नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शाळा म्हणजे मुलांसाठी शिक्षण आणि सुरक्षिततेचं ठिकाण; मात्र याच शाळेत एका नऊ वर्षीय चिमुकल्याला शिक्षिकेकडून छडीने मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदुरा येथील के.डी. इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने हातावर छडीने मारल्याने त्याच्या हाताला मोठी सूज आली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आता थेट गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून दोषी शिक्षिकेवर कारवाईसह शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद वेरुळकर यांचा नऊ वर्षीय मुलगा श्लोक वेरुळकर हा के.डी. इंग्लिश स्कूलमध्ये चौथ्या वर्गात शिक्षण घेत आहे. १९ ऑक्टोबर रोजी वर्गशिक्षिका सोनल नवगजे यांनी श्लोकच्या हातावर छडीने मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत त्याच्या हाताला मोठी सूज आली आणि वेदनेमुळे तो त्रस्त झाला. घाबरलेल्या पालकांनी तातडीने त्याला नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन उपचार केले.
घटनेनंतर विद्यार्थ्याचे वडील विनोद वेरुळकर यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता राजपूत यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. तसेच २१ ऑक्टोबर रोजी शाळा व्यवस्थापनाकडे लेखी तक्रारही सादर केली. मात्र, अनेक दिवस उलटूनही संबंधित शिक्षिकेवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही किंवा पालकांना लेखी उत्तर देण्यात आले नाही, असा आरोप पालकांनी केला आहे. शाळा प्रशासन या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत शारीरिक किंवा मानसिक शिक्षा देण्यास कायद्याने मनाई असतानाही अशा घटना घडत असल्याने शैक्षणिक क्षेत्रात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून शिक्षिका सोनल नवगजे यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासोबतच शाळेतील शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रता, नियुक्त्यांची वैधता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक नियमांचे पालन होते की नाही, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली आहे. चौकशीत अनियमितता आढळल्यास शाळेची मान्यता रद्द करावी, अशी भूमिका पालकांनी घेतली आहे. आता गटशिक्षणाधिकारी या प्रकरणात काय कारवाई करतात आणि विद्यार्थ्याला न्याय मिळतो का, याकडे नांदुरा शहराचे लक्ष लागले आहे
















