चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गोरगरीबांच्या ताटात शासनाकडून वितरित होणारा रेशनचा तांदूळच निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप करत युवासेनेने अनोखे आंदोलन छेडले. युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर यांनी देऊळगाव राजा तहसील कार्यालयात तालुका पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देताना निकृष्ट तांदूळ तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना चक्क दिवाळी भेट म्हणून दिला. या अनोख्या आंदोलनामुळे पुरवठा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यावेळी सचिन कदम उपस्थित होते.
शासनाकडून गोरगरीब, कष्टकरी आणि शेतमजुरांना स्वस्त धान्य दुकानांमार्फत तांदळाचे वितरण केले जाते. मात्र, बुलडाणा जिल्ह्यासह विशेषतः देऊळगाव राजा आणि चिखली तालुक्यात रेशनवर मिळणारा तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांकडून होत असल्याचे भुतेकर यांनी सांगितले. हा तांदूळ खाण्यायोग्य आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित करत गोरगरीबांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
यापूर्वी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर काही काळ चांगल्या दर्जाचे धान्य वितरित झाले; मात्र दोन ते तीन महिन्यांत पुन्हा निकृष्ट धान्याचा पुरवठा सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे धान्याची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा नेमके काय करते, असा सवाल उपस्थित होत आहे. गोरगरीबांच्या ताटात जे धान्य दिले जाते, तेच धान्य आधी अधिकाऱ्यांनी खाऊन दाखवावे, अशी उपरोधिक भूमिका घेत कर्मचाऱ्यांना निकृष्ट तांदळाची दिवाळी भेट देण्यात आली.
यावेळी संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातील रेशन धान्याची स्वतंत्र समितीमार्फत तपासणी करावी, निकृष्ट धान्य पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करावे, दोषी पुरवठा अधिकारी व निरीक्षकांना निलंबित करून विभागीय चौकशी करावी, तसेच धान्याचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तपासून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. लाभार्थ्यांना तातडीने चांगल्या दर्जाचे धान्य उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी करण्यात आली. प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतोष पाटील भुतेकर यांनी दिला.













