Advertisement Advertisement

उदयनगरात कुत्र्याचा हैदोस! एक-दोन नव्हे, तब्बल १५ जणांना घेतला चावा! दीड वर्षांच्या चिमुकलीलाही सोडलं नाही; गावात उडाली खळबळ!

उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : उदयनगर येथे भटक्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घालत एकाच दिवशी तब्बल १५ जणांना चावा घेऊन जखमी केल्याची धक्कादायक घटना ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. बसस्थानक परिसर आणि बँकेत विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांवर कुत्र्याने हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, जखमींमध्ये अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश आहे.

दिवाळीचा सण असल्याने उदयनगर परिसरात खरेदीसाठी तसेच बँकेची कामे करण्यासाठी नागरिकांची मोठी वर्दळ सुरू आहे. करवंड, मोहदरी, वैरागड, वझर यासह आसपासच्या गावांमधून अनेक नागरिक उदयनगर येथे आले होते. मात्र, अचानक एका कुत्र्याने नागरिकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. यात बाहेरगावाहून आलेल्या प्रत्येकी एक नागरिकासह उदयनगर येथील सहा जण आणि इतर अशा जवळपास १५ जणांना कुत्र्याने चावा घेत जखमी केले.

या घटनेनंतर जखमींनी तातडीने उदयनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. तेथे सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. लहान चिमुकलीलाही कुत्र्याने चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, नागरिकांवर हल्ला करणारा कुत्रा पिसाळलेला होता की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र, एकाच दिवशी १५ जणांना चावा घेण्याच्या घटनेने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!