Advertisement Advertisement

वडगाव तेजन टोलनाका बनलाय वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा! धोकादायक भिंतीनं घेतला १५ हून अधिक वाहनांचा बळी; पुन्हा भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी!

वडगाव तेजन (बुलडाणा कव्हरेज न्युज) : वडगाव तेजन येथील टोलनाका वाहनधारकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. टोलनाक्यावरील धोकादायक भिंतीमुळे अपघातांची मालिका सुरूच असून आतापर्यंत लहान-मोठे मिळून १५ हून अधिक वाहनांचे अपघात झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार अपघात होऊनही संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास याच ठिकाणी पुन्हा भीषण अपघात घडला. लोणारकडून मेहकरकडे एमएच २८ एआर ९३७१ क्रमांकाच्या स्कुटीवरून जात असलेले रुपेश मोरे आणि सुयोग मिटकरी यांचा टोलनाक्याजवळ अपघात झाला. या अपघातात स्कुटीचा अक्षरशः चुराडा झाला असून दोघेही गंभीर जखमी झाले. स्कुटीची झालेली अवस्था पाहता अपघाताची तीव्रता लक्षात येत होती. जखमींना पुढील उपचारासाठी मेहकर येथे हलविण्यात आले.

दरम्यान, अपघातानंतर लोणार येथून रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल एक तास लागल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे जखमींना मदत मिळण्यास विलंब झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अपघाताची माहिती मिळताच संतोष चेके, पारडी शिरसाटचे सरपंच पंजाबराव शिरसाट, अनिल जाधव, संतोष जाधव आणि पत्रकार विनोद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्यासाठी प्रयत्न केले.

वडगाव तेजन आणि पारडी शिरसाट येथील ग्रामस्थांकडून टोलनाक्यावरील धोकादायक भिंत हटविण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, अपघातांची संख्या वाढत असतानाही प्रशासन आणि टोल प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आणखी किती अपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार? एखाद्याचा जीव गेल्यानंतरच उपाययोजना करणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

टोलनाक्यावरील धोकादायक भिंत तातडीने हटवून रस्ता वाहनधारकांसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा वडगाव तेजन आणि पारडी शिरसाट येथील ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलनासह उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी, टोल प्रशासन आणि संबंधित विभागाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!