चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली येथे आठ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी सिद्धेश्वर पुंडलिक इंगळे (रा. चिखली) याला बुलडाणा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्रमांक २, ए. जी. संतानी यांनी दोषी ठरवून २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच ५० हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास आणखी तीन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.
ही घटना १४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास चिखली येथे घडली होती. आठ वर्षीय बालिका घरी एकटी असताना आरोपीने तिचा हात धरून तिला बळजबरीने स्वतःच्या घरात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. यापूर्वीही आरोपीने तीन ते चार वेळा बालिकेसोबत असे गैरकृत्य केल्याचे तपासात समोर आले होते. पीडितेच्या कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेता समाजसेविका संघमित्रा नायाबराव कस्तुरे यांनी पुढाकार घेत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, पीडित बालिका, तिची बहीण, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
न्यायालयाने ठोठावलेल्या ५० हजार रुपये दंडाची रक्कम पीडित बालिकेला देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पीडितेला अतिरिक्त आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, यासाठी प्रकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलडाणा यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील अॅड. सोनाली सावजी देशपांडे यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावी युक्तिवाद केला. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर यांनी केला, तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदाराम इंगळे यांनी सहकार्य केले.















