बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : यंदा पावसानं ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आगामी काळात पाणीटंचाईसोबतच पशुधनासाठी चाऱ्याचे संकटही गंभीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि पशुपालकांना ऐनवेळी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच चारा लागवडीचे नियोजन करावे. केंद्र पुरस्कृत ‘जी रामजी’ योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देऊन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चारा लागवड करावी, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पाणीटंचाई व चारा व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, माजी आमदार संजय रायमुलकर यांच्यासह जलसंधारण, मृद व जलसंधारण, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
बियाणे वाटप झाले, आता प्रत्यक्ष पेरणीचा हिशेब द्या!
पशुसंवर्धन विभागामार्फत चारा लागवडीसाठी शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, या बियाण्यांची प्रत्यक्ष पेरणी किती शेतकऱ्यांनी केली, किती क्षेत्रावर चारा लागवड झाली, याची माहिती आता प्रशासनाने गोळा करावी. कृषी सहाय्यक आणि तलाठ्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पडताळणी करून चारा लागवड झालेल्या क्षेत्राची तालुकानिहाय माहिती आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश प्रतापराव जाधव यांनी दिले. ग्रामस्तरावरच चारा लागवडीचे नियोजन करून भविष्यात पशुधनाला चाऱ्याची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितले.
सोयाबीन, तुरीचे कुटारही जनावरांसाठी ठरणार आधार!
खरीप हंगामात पावसाची तूट झाल्याने पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे उपलब्ध चारा जपून वापरण्याची गरज आहे. खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर शेतात शिल्लक राहणारे सोयाबीनचे कुटार, तुरीचे कुटार आणि इतर पिकांचे अवशेष संकलित करून त्यांचा पशुखाद्य म्हणून वापर करावा. पशुपालकांना चाऱ्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुरघास निर्मितीवर भर द्या; दुष्काळाआधीच चारा साठवा!
भविष्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी चारा संवर्धन, मुरघास निर्मिती आणि चाऱ्याची योग्य साठवणूक याबाबत शेतकरी व पशुपालकांमध्ये जनजागृती करावी. पीक अवशेषांचे पोषणमूल्य वाढविण्याबाबत प्रशिक्षण द्यावे. तसेच दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकऱ्यांसाठीच्या उपाययोजना आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती गावागावांत पोहोचवावी, असे आवाहनही केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. आता प्रशासनाच्या या नियोजनातून जिल्ह्यात चारा लागवडीला किती गती मिळते आणि आगामी उन्हाळ्यात पशुधनाला कितपत दिलासा मिळतो, याकडे शेतकरी व पशुपालकांचे लक्ष लागले आहे.














