Advertisement Advertisement

पेनटाकळीच्या पाण्यासाठी राडा; आंदोलन पोहोचलं थेट पोलीस ठाण्याच्या दारात! निवेदन द्यायला गेले अन् PSI सोबतच भिडले! पोलिसांना मारहाण, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल!

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पेनटाकळी धरणाचे पाणी सिंचनासाठी सोडावे, या मागणीवरून मेहकर तालुक्यात आंदोलनांचा जोर वाढला आहे. माजी आमदार संजय रायमूलकर यांच्या उपोषणानंतर आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उबाठा) पक्षाने धरणावर मोर्चा काढला. त्यातच ६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या वतीने मेहकर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद होऊन पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणी गवळी येथील प्रशांत दिलीप वानखेडे (वय ४६) यांनी फेसबुकवर पेनटाकळी धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे, राजकारण बंद करून धरणाचे दरवाजे तातडीने उघडावेत, अशी पोस्ट केली होती. तसेच १०० शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशांत वानखेडे यांच्यासह महादेव सखाराम वानखेडे (वय ५०), शरद गणेश चंद्रे (वय ३६), आनंदा गोपाळा भालेराव (वय ६७) आणि इतर कार्यकर्ते ६ नोव्हेंबर रोजी पेनटाकळीकडे जाणार होते.

मात्र, त्यापूर्वी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास आंदोलक निवेदन देण्यासाठी मेहकर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात पोहोचले. यावेळी डोणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय मुरलीधर अजमीरे (वय ४०) बंदोबस्तावर होते. आंदोलक उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्याशी चर्चा करीत असताना अचानक वातावरण तापले. यावेळी प्रशांत वानखेडे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचा आरोप असून, त्यांनी पीएसआय अजमीरे यांच्या अंगावर धाव घेत पोटात बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी पीएसआय विजय अजमीरे यांच्या तक्रारीवरून संबंधित कार्यकर्त्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पेनटाकळी धरणातील पाणी शेतकऱ्यांना मिळावे, या मागणीवरून सुरू झालेल्या आंदोलनाला आता वेगळे वळण मिळाले असून, पाण्याच्या प्रश्नावरून मेहकर तालुक्यात राजकीय वातावरणही तापले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार की आंदोलनाचा वाद आणखी वाढणार, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!