Advertisement Advertisement

शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीच्या याद्यांतच अडकले!आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या दारात पोहोचले रोहित पवार;गावोगावी जाऊन घेतली दुःखाची जाण! जिल्ह्यात आमदार-खासदार असताना, पण शेतकरी कुटुंबांच्या अश्रूंना पुसायला कोण आलं?

सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा झाली असली, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास होत असलेल्या विलंबावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. राज्यात तब्बल ५५ लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असताना आतापर्यंत केवळ २४ लाख शेतकऱ्यांचीच नावे जाहीर झाली असून, त्यापैकी फक्त १२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. मग उर्वरित शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वाट किती दिवस पाहायची? हा शासनाचा नाकर्तेपणा नव्हे तर काय? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

४ नोव्हेंबर रोजी आमदार रोहित पवार यांनी सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा, बामखेड आणि रताळी येथे भेटी देत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शासनाकडून मिळणारी मदत, त्यासाठी करावी लागणारी धावपळ आणि प्रशासकीय प्रक्रियेत येणारे अडथळे याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. शासकीय मदत मिळवून देताना एखादा अधिकारी अडवणूक करीत असेल, तर थेट माझ्याशी संपर्क साधा. संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

रताळीच्या ७० शेतकऱ्यांनाच कर्जमाफी; बाकीच्यांनी काय करायचं?

रताळी येथील शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या प्रश्नावर आमदार रोहित पवार यांचे लक्ष वेधले. गावातील केवळ ७० शेतकऱ्यांचीच नावे कर्जमाफीच्या यादीत जाहीर झाली असून, उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार आणि त्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार, असा सवाल ग्रामस्थांनी केला. यावर बोलताना पवार यांनी कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील दिरंगाईवर सरकारला जाब विचारला.

आकाश पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट; मदतीचा विलंब तपासणार!

रताळी येथील आकाश बळीराम पाटील (वय २४) या शेतकरी पुत्राने २६ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या घरी जाऊन वडील बळीराम पाटील आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. या कुटुंबाला शासनाकडून आजपर्यंत किती मदत मिळाली, मदत मिळण्यास विलंब का झाला, याची माहिती जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक अनेक संकटांना तोंड देत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने संकटांचा सामना करावा. आत्महत्या हा प्रश्नांवरचा उपाय नाही. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट ओढवते. त्यामुळे अशा कुटुंबांना शासनाबरोबरच समाजानेही मदतीचा हात देण्याची गरज आहे. राज्यभरातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या भेटीत अनेक गंभीर वास्तव समोर येत असल्याचेही पवार यांनी सांगितले.

साखरखेर्ड्यात रात्री अकरापर्यंत भेटी; सरपंचाच्या दुचाकीवरून गाव दौरा!

साखरखेर्डा येथील संतोष खरात आणि गोविंदराव बेंडमाळी यांच्या कुटुंबीयांचीही आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली. विशेष म्हणजे, गावातील कुटुंबीयांच्या भेटीसाठी त्यांनी थेट सरपंच अमित जाधव यांच्या मोटारसायकलवरून प्रवास केला. रात्री अकरा वाजेपर्यंत त्यांनी विविध कुटुंबीयांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

दरम्यान, जिल्ह्यात आठ आमदार, खासदार, मंत्री आणि माजी मंत्री असतानाही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या भेटीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी का आले नाहीत, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये रंगली होती. शरद पवार यांच्यानंतर सामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्याची हातोटी रोहित पवार यांच्यात असल्याची प्रतिक्रियाही काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश पाटील भुतेकर, नगराध्यक्ष सौरभ तायडे प्रेसंजित पाटील, सतीश काळे, दिनकरराव देशमुख, रामभाऊ जाधव, राजू ठोके, उमेश शेजूळ, अनिल तुपकर, अमित जाधव, कमलाकर गवई, सय्यद रफीक, योगेश नाईक, डॉ. ज्योतीताई खेडेकर, आदित्य काटे, दिलीप खंडारे, आयुब कुरेशी, दिलीप बेंडमाळी, श्रीकांत पहाड, शुभम राजपूत, वामन नाईक, रमेश नन्हई, ज्ञानेश्वर मुदमाळी, माधव नाईक, गणपत अवचार, भानुदास लव्हाळे, अलका लव्हाळे, उषा पाटील, समाधान पाटील, दिलीप सोभागे यांच्यासह शेकडो शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!