Advertisement Advertisement

दुष्काळानं शेतकऱ्यांचं पीक हिरावलं, आता मजुरीसाठी मजुरांची रोजगार हमीवर गर्दी! बुलढाण्यात मजुरांची संख्या ४७ टक्क्यांनी वाढली….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : खरीप हंगाम संपला की शेतातील काढणी-मळणीच्या कामातून शेतमजुरांच्या हाताला रोजगार मिळतो. याच मजुरीतून अनेक कुटुंबांचा वर्षभराचा घरखर्च भागवला जातो. मात्र, यंदा पावसाच्या लहरीपणामुळे आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे खरीप पिकांचे उत्पादन घटले. परिणामी शेतातील मजुरीची कामेही कमी झाली असून, आता नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात शेतमजुरांना रोजगार हमी योजनेचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्ह्यात ४ नोव्हेंबर रोजी रोजगार हमी योजनेच्या कामांवर तब्बल १३ हजार ४४९ मजूर उपस्थित होते. गतवर्षी याच कालावधीत ही संख्या ९ हजार १४६ होती. म्हणजेच यंदा ४ हजार ३०३ मजुरांची वाढ झाली असून, मजुरांची उपस्थिती तब्बल ४७ टक्क्यांनी वाढल्याचे चित्र आहे.

३८१ ग्रामपंचायतींवरून थेट ६७५ ग्रामपंचायतींमध्ये कामे!

रोजगाराची गरज किती वाढली आहे, हे सुरू असलेल्या कामांच्या संख्येवरूनही स्पष्ट होत आहे. गतवर्षी ३८१ ग्रामपंचायतींमध्ये २ हजार ६९४ कामे सुरू होती. यंदा ४ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील ६७५ ग्रामपंचायतींमध्ये तब्बल ७ हजार ९५५ कामे सुरू होती. म्हणजेच गावोगावी रोजगार हमीच्या कामांचा विस्तार वाढला आहे. गावातच काम मिळाले, तर मजुरांचे स्थलांतर थांबण्यास मदत होऊ शकते.

चिखली तालुक्यात मजुरांची सर्वाधिक गर्दी!

तालुकानिहाय आकडेवारी पाहिली तर चिखली तालुका रोजगार हमीच्या कामांवरील मजुरांच्या उपस्थितीत आघाडीवर आहे. चिखलीत १ हजार ५८७ कामांवर तब्बल २ हजार ३८६ मजूर काम करत होते. गतवर्षी याच तुलनात्मक नोंदीत ही संख्या अवघी १७१ होती. लोणार तालुक्यातही मजुरांची संख्या ३९० वरून १ हजार १५३ वर पोहोचली, तर जळगाव जामोद तालुक्यात ५४८ वरून १ हजार २५६ पर्यंत वाढ झाली. दुसरीकडे मेहकर, मोताळा, खामगाव आणि सिंदखेडराजा या चार तालुक्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत मजुरांची उपस्थिती कमी होती. मात्र, आगामी काळात या तालुक्यांमध्येही मजुरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

७२ हजार ५७५ कुटुंबांना रोजगाराचा आधार!

२०२६-२७ या आर्थिक वर्षातील एकत्रित आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत ७२ हजार ५७५ कुटुंबांतील १ लाख १६ हजार ५२६ व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. या माध्यमातून जिल्ह्यात एकूण १६ लाख ७० हजार ४७७ मनुष्यदिवसांची नोंद झाली आहे. सिंदखेडराजा तालुक्यात सर्वाधिक १८ हजार ४३२ व्यक्तींना रोजगार मिळाला, तर चिखली तालुक्यात सर्वाधिक २ लाख ४५ हजार ७८ मनुष्यदिवसांची नोंद झाली आहे.

ऑक्टोबरमध्येच रोजगाराची मागणी वाढली!

दुष्काळाची झळ केवळ नोव्हेंबरमध्येच जाणवू लागली असे नाही, तर ऑक्टोबर महिन्यापासूनच रोजगार हमीच्या कामांवरील मजुरांची संख्या वाढू लागली होती. १ ऑक्टोबर २०२५ मध्ये जिल्ह्यात ७८ हजार २६७ मनुष्यदिवसांची नोंद होती. यंदा ऑक्टोबरमध्ये ही संख्या १ लाख २१ हजार ७२८ वर पोहोचली. म्हणजेच गतवर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यंदा तब्बल ४३ हजार ४६१ मनुष्यदिवसांची वाढ झाली आहे.

एकंदरीत, खरीप हंगामातील पिकांनी हात आखडता घेतल्याने शेतमजुरांच्या हातालाही काम उरले नाही. उन्हाळा अजून दूर असतानाच रोजगार हमीच्या कामांवर मजुरांची एवढी गर्दी होत असेल, तर पुढील काही महिने परिस्थिती आणखी कठीण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावोगावी रोजगाराची कामे वेळेवर सुरू ठेवणे आणि मजुरांना स्थानिक पातळीवर काम उपलब्ध करून देणे, हे जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. आगामी काळात रोजगार हमी योजनेवरील कामांची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!