शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): लग्नाचे आमिष दाखवून एका २७ वर्षीय महिलेची फसवणूक करत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार शेगाव येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार, आरोपी कार्तीक स्वामी वानखडे (रा. घाटपुरी बायपास, पंजाब लेआऊटजवळ, खामगाव) याने पीडित महिलेला लग्नाचे आश्वासन दिले होते. नोव्हेंबर २०२५ पासून मे २०२६ पर्यंत आरोपीने शेगाव येथील एका लॉजवर नेत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच ४ मे रोजी रात्री आरोपीने पीडितेला घरी बोलावून पुन्हा लग्नाचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर पीडित महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपी टाळाटाळ करू लागला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने शेगाव शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध अप. क्र. ३०३/२०२६ अन्वये बीएनएस कलम ६९ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार विविध कलमांखाली गुन्हा नोंदविला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.














