जळगाव जामोद(बुलडाणा कव्हरेज न्युज)जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात आढळून आलेल्या शिरविरहित महिलेच्या मृतदेहाच्या गूढाने आता अधिकच रहस्यमय वळण घेतले आहे. आधीच चुकीच्या तपासामुळे पोलिस दलाची राज्यभरात मोठी नामुष्की झाल्यानंतर आता या हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी तब्बल ३४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष टीम मैदानात उतरली आहे. मृतदेहाच्या हातातील हिरव्या बांगड्या, नखांवरील मेहंदी, गळ्यातील व मनगटावरील काळा धागा आणि कपड्यांच्या आधारे तपासाची दिशा ठरविण्यात येत असून, याच धागेदोऱ्यांतून या मर्डर मिस्ट्रीचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
२६ एप्रिल २०२६ रोजी राजुरा शिवारातील सातपुड्याच्या दुर्गम जंगल परिसरात एका अज्ञात महिलेचे अर्धवट जळालेले धड आढळून आले होते. ओळख नष्ट करण्याच्या उद्देशाने मारेकऱ्याने तिचे शीर धडावेगळे केल्याचे निष्पन्न झाले होते. याच परिसरात काही अंतरावर अर्धवट जळालेली मानवी कवटीही पोलिसांना सापडली होती. या घटनेनंतर जळगाव जामोद पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने मृतदेहाची ओळख पटल्याचा दावा करत मध्य प्रदेशातील खकनार येथील पिता-पुत्राला अटक केली होती. मात्र जिच्या खुनाचा आरोप ठेवून ही कारवाई करण्यात आली, तीच तरुणी नंतर जिवंत अवस्थेत समोर आल्याने पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या प्रकरणामुळे पोलिस दलाची प्रतिमा डागाळली गेली असून तपासाची जबाबदारी मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
हिरव्या बांगड्या अन् मेहंदी बनणार तपासाचा धागा?
मृत तरुणीच्या हातात हिरव्या काचेच्या बांगड्या, नखांवर मेहंदी, गळ्यात व हातात काळा धागा आढळून आला आहे. या बाबींच्या आधारे ती विशिष्ट समाज, समुदाय किंवा सीमावर्ती भागातील असण्याची शक्यता पोलिस तपासत आहेत. तरुणीच्या पायातील स्टायलिश सँडल, कपडे आणि राहणीमानावरून ती मध्यमवर्गीय कुटुंबातील असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सातपुड्यात हायटेक तपासासोबत खबऱ्यांचे जाळेही सक्रिय….
घटनास्थळ दुर्गम आणि सीसीटीव्हीविरहित असल्याने पोलिसांना पारंपरिक आणि तांत्रिक तपासाची सांगड घालावी लागणार आहे. स्थानिक गुराखी, लाकूडतोडे, आदिवासी नागरिक आणि खबऱ्यांच्या माध्यमातून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्याचवेळी महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमावर्ती भागातील बेपत्ता महिलांची माहिती तपासली जात आहे.
मोबाईल टॉवर डम्प डेटा, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि त्या रात्री परिसरात सक्रिय असलेल्या मोबाईल क्रमांकांचा अभ्यास करूनही तपास पुढे नेला जात आहे. सीसीटीव्ही नसला तरी मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांना आहे.
३४ जणांची विशेष टीम तपासात…
या गूढ हत्याकांडाचा उलगडा करण्यासाठी आधीपासून कार्यरत २६ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकासोबत आणखी ८ जणांची विशेष ‘क्रॅक टीम’ ३ जून रोजी गठीत करण्यात आली आहे. दोन्ही पथके डीवायएसपी संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून खामगावचे एएसपी लोढा यांचे त्यांच्यावर नियंत्रण आहे.
ठाणेदार सचिन बागुल, सपोनि गजानन कौळासे, विकास पाटील, यशोदा कनसे, युवराज रबडे, शरद माळी, अशोक अवचार यांच्यासह अनेक अधिकारी आणि अंमलदार या तपासात सक्रीय झाले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष तपासाकडे….
राजुरा शिवारातील ‘सरकटी लाश’ प्रकरणाने महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातही खळबळ उडवली आहे. चुकीच्या तपासामुळे निर्माण झालेली नामुष्की दूर करत खऱ्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. हिरव्या बांगड्या, मेहंदी आणि काळ्या धाग्यापासून सुरू झालेला तपास आता कोणत्या दिशेने वळतो आणि या रहस्यमय हत्याकांडाचा उलगडा कधी होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












