खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या घराच्या भिंतीची पाहणी करत असताना अचानक भिंत अंगावर कोसळून सासरा व जावयाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवार, २८ मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.
मृतांची नावे मुकद्दर खान जमशद खान (वय ७४) आणि शेख युसुफ शेख बिस्मिल्ला (वय ३८) अशी असून दोघेही पिंपळगाव राजा येथील रहिवासी होते. नात्याने ते सासरे-जावई होते. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या घराचे बांधकाम सुरू असून उभारण्यात आलेल्या भिंतींची पाहणी करण्यासाठी दोघेही घटनास्थळी गेले होते.
दरम्यान, रात्री साडेआठच्या सुमारास अचानक भिंत कोसळल्याने दोघेही मलब्याखाली दबले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मलब्याखालून दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे पिंपळगाव राजा गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याप्रकरणी सामान्य रुग्णालयातील डॉ. चरखा यांच्या वतीने कक्षसेवक विलास वडोदे यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नारायण चव्हाण करीत आहेत.














