चांडोळ (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : बुलढाणा तालुक्यातील धाड पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या अफसर बलदार बरडे (वय ३८, रा. जामठी) याला दोन महिन्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. अवैध दारू विक्रीमुळे युवक व सर्वसामान्य नागरिकांवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन प्रशासनाने ही कठोर कारवाई केली.
जिल्ह्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिले होते. त्यानुसार धाड पोलिसांनी अफसर बरडे याच्या विरोधात प्रस्ताव सादर केला होता.
उपविभागीय दंडाधिकारी, बुलढाणा यांनी ११ मे रोजी दिलेल्या आदेशान्वये अफसर बरडे याला दोन महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. हद्दपारी प्रस्तावाच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामार्फत संबंधिताला बाजू मांडण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात आला होता. मात्र त्याच्यावर पूर्वीच्या कारवायांचा कोणताही परिणाम होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर अखेर हद्दपारीची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली धाड ठाणेदार प्रताप भोसले, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे, प्रभाकर लोखंडे व त्यांच्या पथकाने केली.












