बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आता पुन्हा एकदा जोरदार लढा उभा राहताना दिसतोय. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन योद्धा दीपक बोराडे यांनी आमरण उपोषण सुरू केलं असून, या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळू लागलाय.
या पार्श्वभूमीवर २३ मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या धनगर आरक्षण मोर्चात जास्तीत जास्त समाजबांधवांनी सहभागी व्हावं, असं जोरदार आवाहन सकल धनगर समाज सेना चिखलीचे तालुका अध्यक्ष दीपक गजानन कळंगे यांनी केलं आहे.
“ही लढाई एकट्या बोराडे नाही, तर संपूर्ण धनगर समाजाची आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. दोन-चार दिवस कामधंदा सोडून मुंबई गाठली, तर भविष्यात मुलाबाळांचं आयुष्य सुरक्षित होईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तसंच, “कोणाच्या फोनची वाट बघू नका, स्वतःहून पुढे या आणि आंदोलनात सहभागी व्हा. सरकारला समाजाची ताकद दाखवण्याची हीच वेळ आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, धनगर समाज मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होण्याची चिन्हं दिसत आहेत.













