डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): माहेरून व्यवसायासाठी ५ लाख रुपये घेऊन ये, अन्यथा तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी देत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी डोणगाव पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरती प्रेमनाथ इंगळे (वय २१, रा. विठ्ठलवाडी) हिचा विवाह प्रेमनाथ रवींद्र इंगळे याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर काही काळ त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. आरोपी प्रेमनाथ हा अकोला येथील एका कंपनीत नोकरी करत होता, तर आरती ही बी.ए. एलएल.बी.चे शिक्षण घेत होती.
दरम्यान, प्रेमनाथचे कामकाज व्यवस्थित न चालल्याने तो दारूच्या आहारी गेला. त्यानंतर त्याने आरतीकडे माहेरून व्यवसायासाठी ५ लाख रुपये आणण्याची मागणी सुरू केली. पैसे आणले नाही तर घरात राहू देणार नाही, अशी धमकी देत तिचा छळ केला. तसेच तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सततच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आरती ही माहेरी निघून गेली. यानंतर तिने डोणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरती इंगळे यांच्या तक्रारीवरून डोणगाव पोलिसांनी आरोपी प्रेमनाथ रवींद्र इंगळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ३५२, ३५१ (२) व ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार ईश्वर सोनुने करीत आहेत.












