बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील रायपूर येथील भारत गॅस एजन्सीकडून घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप करत संबंधित एजन्सीवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उबाठा शिवसेनेचे चिखली उपशहर प्रमुख राहुल वरवंडे यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी १८ मे रोजी जिल्हाधिकारी तसेच बुलढाणा तहसीलदार यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, ९५० रुपयांना मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर तब्बल २ हजार रुपयांत विकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच गॅस सिलेंडरचा अवैध साठा चिखली शहरातील सैलानी नगर परिसरात ठेवण्यात येत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
सैलानी नगर परिसरातून नागरिकांकडून अतिरिक्त पैसे घेऊन गॅस सिलेंडर पुरवठा केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय असुरक्षित पद्धतीने ऑटो आणि कारमध्ये गॅस भरण्याचे प्रकार सुरू असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांकडूनही ५०० ते १००० रुपये अतिरिक्त घेऊन गॅस सिलेंडर दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला असून केंद्र शासनाच्या उज्ज्वला योजनेचाही गैरवापर होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित भारत गॅस एजन्सीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर राहुल वरवंडे यांच्यासह महेंद्र जाधव, पुंजाजी शेळके, समाधान जाधव, अक्षय, शेख अफसर शेख, दीपक जाधव, संतोषराव देशमुख, प्रल्हाद वाघ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.













