नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बारावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शहरातील भीमनगर परिसरात २ मे रोजी उघडकीस आली.
पायल प्रकाश तिडके (वय १७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २ मे रोजी बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर केला. पायलने आपला निकाल पाहिला; मात्र अपेक्षित गुण न मिळाल्याने ती निराश झाली.
या नैराश्यातूनच पायलने घरातील जिन्याजवळील लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना समजताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, तेजराव वाकोडे यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.













