सिंदखेड राजा/चिखली : (बुलडाणा कव्हरेज न्युज) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कथित आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सिंदखेड राजा आणि चिखली येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.
सिंदखेड राजात ‘जोडे मारो’ आंदोलन…..
सिंदखेड राजा शहरातील बसस्थानकासमोर ५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेअकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष अॅड. नाझेर काजी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलकांनी हातात निषेधाचे फलक घेत काँग्रेस पक्ष आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी ‘जाहीर निषेध’ अशा घोषणा देत संबंधित वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसवर टीका केली. महाराष्ट्राच्या संस्कृतीत महिलांचा सन्मान महत्त्वाचा असून, राजकीय मतभेद असले तरी महिलांबाबत अवमानकारक भाषा वापरणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित वक्तव्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करून माफी मागावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी अॅड. नाझेर काजी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ जाधव, शहराध्यक्ष वैभव मीनासे, नगरसेवक कैलास म्हस्के, नगरसेवक आवेज खान, धांदरवाडीचे सरपंच नितीन शेळके, ज्येष्ठ नेते भगवानराव सातपुते, युवा नेते राजेंद्र अंभोरे, नेते मारुती काकडे, युवक शहराध्यक्ष आरेफ चौधरी, विजय कुहिरे, विजय तायडे, सागर मेहत्रे, सतीश आढाव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चिखलीतही राष्ट्रवादीचा निषेध…..
दरम्यान, चिखली येथेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांच्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेसचा निषेध केला.
‘महिलांचा अपमान करणारी भाषा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि असा अवमान सहन केला जाणार नाही,’ असा इशारा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. महिलांचा आदर राखणे ही महाराष्ट्राची परंपरा असल्याचे सांगत संबंधित वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे, विधानसभा संपर्क प्रमुख मनोज दांडगे, तालुका अध्यक्ष संतोष परिहार यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सिंदखेड राजा आणि चिखली येथे झालेल्या या आंदोलनामुळे संबंधित राजकीय वक्तव्याचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यातही उमटल्याचे दिसून आले.














