धामणगाव बढे (बुलडाणा कव्हरेज न्युज): धामणगाव बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पतीसह सासू-सासरे आणि मध्यस्थ महिलेविरुद्ध पोक्सो कायद्यासह बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्दापूर (ता. मोताळा) येथील पवन भाऊराव ससाणे याने १७ वर्षे ११ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण केले. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिचे आई-वडील नव्हे, तर आरोपीचे कुटुंबीय आणि मध्यस्थ महिलेने संगनमत करून तिचा विवाह लावून दिल्याचा आरोप आहे.
विवाहानंतर पवन ससाणे याने पीडित मुलीशी वारंवार लैंगिक संबंध ठेवल्याने ती गरोदर राहिली. त्यानंतर पीडितेने बुलढाणा येथील सामान्य स्त्री रुग्णालयात एका मुलाला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक सुषमा पाटील आणि पोलीस अंमलदार विठ्ठल कोल्हे यांच्या माध्यमातून पीडितेचा जवाब नोंदविण्यात आला. तिच्या जवाबावरून पती पवन ससाणे, सासरे भाऊराव ससाणे, सासू रेखा ससाणे (सर्व रा. फर्दापूर) आणि मध्यस्थ सुधंधी मोग्या वाडिया (रा. भैसदेल, मध्य प्रदेश) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(१), ६४(२)(एम), ३(५), पोक्सो कायद्यातील कलम ४ व ६ तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील कलम ९, १० आणि ११ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास धामणगाव बढे पोलीस ठाण्याचे ठाणेदार निखिल निर्मळ करीत आहेत.















