Advertisement Advertisement

पुन्हा एसआयआर मोहीम लांबली! अंतिम मतदार यादी आता २७ ऑक्टोबरला! जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकाही पुढे जाण्याची शक्यता?

बुलडाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज) : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरावलोकन अर्थात एसआयआर (SIR) मोहिमेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. बूथ लेव्हल अधिकाऱ्यांकडून (BLO) मतदारांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करण्यासाठी देण्यात आलेली मुदत आता आणखी १० दिवसांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेचा परिणाम अंतिम मतदार यादीच्या प्रकाशनाच्या तारखेवर झाला आहे.

यापूर्वी BLO अधिकाऱ्यांनी ३० जुलैपर्यंत मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन पडताळणी करण्याचे नियोजन होते. त्यानंतर ही मुदत ८ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. आता पुन्हा १० दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याने १७ ऑगस्टपर्यंत BLO अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांची माहिती तपासणार आहेत.

प्रारूप मतदार यादी २४ ऑगस्टला?

नव्या वेळापत्रकानुसार १७ ऑगस्टला प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी आता २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. या प्रारूप मतदार यादीवर नागरिकांना दावे आणि हरकती दाखल करण्याची संधी मिळणार आहे.

२४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर प्राप्त दावे आणि हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे.

या सर्व प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

यापूर्वी अंतिम मतदार यादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार होती. त्यानंतर ही तारीख १८ ऑक्टोबर करण्यात आली होती. आता पुन्हा वेळापत्रकात बदल झाल्याने अंतिम यादीची तारीख २७ ऑक्टोबर झाली आहे.

दुबार आणि मयत मतदारांचीही होणार तपासणी…..

एसआयआर मोहिमेचा मुख्य उद्देश पात्र मतदार मतदार यादीच्या बाहेर राहू नये आणि अपात्र मतदार यादीत राहू नये हा आहे. या प्रक्रियेत दुबार नोंद असलेले मतदार, मयत व्यक्तींची नावे तसेच इतर अपात्र नोंदींची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे.

त्यामुळे मतदारांनी आपल्या नावाची नोंद, पत्ता आणि इतर तपशील तपासून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर चुकीची नोंद आढळल्यास नागरिकांना नियोजित कालावधीत दावे किंवा हरकती दाखल करता येणार आहेत.

ZP, ग्रामपंचायत निवडणुका आणखी लांबण्याची शक्यता?

दरम्यान, एसआयआर प्रक्रियेला लागणाऱ्या अतिरिक्त वेळेमुळे महाराष्ट्रातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

एसआयआर मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आल्याने सध्या निवडणूक प्रक्रियेसाठी मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याची बाब राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती.

त्यामुळे एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना गती मिळण्याची शक्यता आहे. अंतिम मतदार यादीची तारीख २७ ऑक्टोबरपर्यंत पुढे गेल्याने ZP आणि ग्रामपंचायत निवडणुका आणखी पुढे जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!