देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील सिनगाव जहाँगीर येथे देऊळगाव राजा पोलिसांनी मंगळवारी कारवाई करीत देशी दारूच्या १४४ बाटल्या आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण १ लाख ६२ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. परवानगीविना मद्याची वाहतूक तसेच मद्य बाळगल्याच्या आरोपावरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिनगाव जहाँगीर परिसरात अवैधरीत्या दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत देशी दारूच्या एकूण १४४ बाटल्या पोलिसांच्या हाती लागल्या.
दारूच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एमएच १५-सीडी २७२१ क्रमांकाची कारदेखील पोलिसांनी जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या दारूसह वाहनाची एकूण किंमत १ लाख ६२ हजार ९६० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी परवानगीविना मद्याची वाहतूक करणे तसेच मद्य ताब्यात बाळगल्याच्या आरोपावरून तिघांविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देऊळगाव राजा पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध मद्यविक्री व वाहतुकीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
















