Advertisement Advertisement

येळगाव धरण तुडुंब, पण जिल्ह्यातली मोठी धरणं अर्ध्यावर; पाऊस पडतोय पण धरणं भरंना! काही प्रकल्पांत फक्त ४० टक्के पाणी….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाला असतानाही बुलढाणा जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम जलप्रकल्पांना अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या केवळ ४०.८४ टक्के, तर सात मध्यम प्रकल्पांमध्ये ६५.८६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी काळातील पाणीटंचाई आणि सिंचनाच्या प्रश्नासाठी जोरदार पावसाची गरज निर्माण झाली आहे.

यंदा पावसाळ्याला उशिराने सुरुवात झाली. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आभाळाकडे लागले होते. त्यानंतर पावसाने हजेरी लावली असली तरी जिल्ह्यात सर्वदूर अपेक्षित असा दमदार पाऊस झालेला नाही. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी धरणक्षेत्रात जोरदार पाऊस नसल्याने मोठ्या जलप्रकल्पांच्या पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही.

जिल्ह्यातील जलसाठ्यांचा विचार करता नळगंगा, खडकपूर्णा आणि पेनटाकळी हे तीन मोठे प्रकल्प आहेत. तर ज्ञानगंगा, मस, कोराडी, पलढग, मन, तोरणा आणि उतावळी हे सात मध्यम प्रकल्प आहेत. तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूण ४०.८४ टक्के जलसाठा असून सात मध्यम प्रकल्पांमध्ये ६५.८६ टक्के पाणीसाठा आहे. तसेच जिल्ह्यातील ४१ लघु प्रकल्पांमध्ये २८.०६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

येळगाव धरण शंभर टक्के भरले

बुलढाणा शहर व परिसरासाठी मात्र दिलासादायक चित्र आहे. गत आठवड्यात बुलढाणा परिसरात झालेल्या चांगल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण १०० टक्के भरले आहे. येळगाव धरणाचा संकल्पित साठा ६०५ दलघमी असून धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे बुलढाणा शहरासह आजूबाजूच्या गावांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे.

नळगंगेत ७२.३० टक्के जलसाठा

मोताळा तालुका हा तुलनेने अवर्षणप्रवण भाग म्हणून ओळखला जातो. या भागात जिल्ह्याच्या इतर भागांच्या तुलनेत कमी पाऊस पडत असल्याने शेतकरी आणि नागरिकांची मोठी मदार नळगंगा प्रकल्पावर आहे.

नळगंगा हा जिल्ह्यातील महत्त्वाचा मोठा प्रकल्प असून त्याचा संकल्पित साठा ६९.३२ दलघमी आहे. सध्या या धरणात ५०.१२० दलघमी पाणीसाठा असून धरण ७२.३० टक्के भरले आहे. याशिवाय मोताळा तालुक्यातील पलढग मध्यम प्रकल्प सुमारे ८० टक्के भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पेनटाकळीत ६८.०८ टक्के साठा

मेहकर तालुक्यासह आसपासच्या भागासाठी पेनटाकळी प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. या जलाशयावर मोठ्या प्रमाणात शेती सिंचनासाठी अवलंबून आहे. पेनटाकळी प्रकल्पाचा संकल्पित साठा ५९.९७ दलघमी आहे.

मंगळवारी जलाशयाची पातळी ५५६.५० मीटर होती. प्रकल्पात ४०.८२८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून धरण ६८.०८ टक्के भरले आहे. पेनटाकळी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी धरणक्षेत्रात आणखी जोरदार पावसाची आवश्यकता आहे. धरण भरल्यास मेहकरसह परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

दमदार पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

सध्या जिल्ह्यात काही भागात पावसाची रिपरिप सुरू असली तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याशिवाय जलसाठ्यात मोठी वाढ होणार नाही. त्यामुळे आगामी काळात पावसाने जोर धरावा आणि मोठे-मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरावेत, अशी अपेक्षा शेतकरी आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!