निमगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नारखेड-अवधा रोडवरील अवधा फाट्याजवळ १३ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. बजरंग आत्माराम पोलाखरे (वय ५५, रा. नांदुरा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मुलीकडे मुक्काम करून नांदुऱ्याकडे परतत असताना रानडुकराने अचानक दुचाकीसमोर धाव घेतल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी मृतकाचे भाऊ श्रीकृष्ण आत्माराम पोलाखरे (वय ६०, रा. नांदुरा) यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांना पुतण्या दीपक बजरंग पोलाखरे याचा फोन आला. नारखेड ते अवधा रोडवर रानडुक्कर आडवे आल्याने वडिलांच्या दुचाकीचा अपघात झाला असून ते जखमी अवस्थेत असल्याची माहिती त्याने दिली.
माहिती मिळताच श्रीकृष्ण पोलाखरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी बजरंग पोलाखरे हे रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेले होते. त्यांची दुचाकी (क्रमांक MH 28 88648) देखील बाजूला पडलेली होती. घटनास्थळी उपस्थित नागरिकांकडून माहिती घेतली असता रानडुक्कर अचानक आडवे आल्याने दुचाकीचा अपघात झाल्याचे समजले. त्यानंतर ओमसाई फाउंडेशन, नांदुरा यांची रुग्णवाहिका बोलावून त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एन. रोजतकार यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
बजरंग पोलाखरे हे १२ नोव्हेंबर रोजी सोयरीक संबंधाच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यानंतर शेगाव तालुक्यातील जलंब येथे मुलीकडे मुक्काम करून १३ नोव्हेंबर रोजी सकाळी नांदुऱ्याकडे परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली असा मोठा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ओमसाई फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी मदतकार्य केले. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.














