Advertisement Advertisement

दुष्काळात रेशनचा घास हिरावलेल्या हजारो कुटुंबांना पुन्हा धान्याची आशा; रेशन बंद झाल्यानं घराघरात धान्याचा ठणठणाट; आता दुष्काळ संपेपर्यंत सर्वांना धान्य देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): दुष्काळाच्या झळांनी आधीच आर्थिक कंबरडे मोडलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि गरजू कुटुंबांसाठी आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. ‘मिशन सुधार’ मोहिमेंतर्गत शिधापत्रिकेवरील नावे वगळल्यामुळे धान्यापासून वंचित झालेल्या हजारो कुटुंबांना पुन्हा रेशनवर धान्य मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थिती असेपर्यंत पिवळ्या, केशरी आणि पांढऱ्या अशा सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना धान्य देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वंचित कुटुंबांच्या आशा पल्लवित झाल्या असून आता शासनाच्या अधिकृत आदेशाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, ‘मिशन सुधार’ मोहिमेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल ३८ हजार २१३ शिधापत्रिकाधारकांचा धान्यपुरवठा बंद करण्यात आला आहे. आणखी ३८ हजारांहून अधिक लाभार्थ्यांच्या पात्रतेची पडताळणी सुरू आहे. यामध्ये दुबार नोंदी, मृत लाभार्थी, आयकर भरणारे, शासकीय सेवेत असलेले तसेच निर्धारित उत्पन्न मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांची तपासणी केली जात आहे. मात्र, या कारवाईच्या फेऱ्यात काही खरोखर गरजू कुटुंबांचाही धान्यपुरवठा बंद झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.

दुष्काळात शेतकऱ्यांच्या घरात धान्याचा प्रश्न!

यंदा पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित पैसा आला नाही, तर दुसरीकडे शेतातील कामे कमी झाल्याने शेतमजुरांनाही रोजगार मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत घरातील चूल पेटवण्यासाठी रेशनच्या धान्याचा मोठा आधार असतो. मात्र, शिधापत्रिकेवरील नावे वगळल्याने अनेक कुटुंबांना हा आधारही गमवावा लागला आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे या कुटुंबांना पुन्हा धान्य मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

पात्र कुटुंबांना योजनेत समाविष्ट करण्याची तरतूद!

राज्य शासनाने ९ ऑक्टोबर २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेबाहेरील पात्र कुटुंबांना अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी निर्धारित उत्पन्न निकष, आवश्यक कागदपत्रे आणि उपलब्ध लाभार्थी मर्यादा विचारात घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे ‘मिशन सुधार’ मोहिमेत रद्द करण्यात आलेल्या शिधापत्रिकांची संख्याही नवीन पात्र लाभार्थ्यांचा समावेश करताना विचारात घेण्याचे निर्देश आहेत.

घोषणा झाली, आता धान्य कधी मिळणार?

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे हजारो कुटुंबांच्या मनात पुन्हा आशेचा किरण निर्माण झाला असला, तरी प्रत्यक्षात धान्यवाटप कधी सुरू होणार, हा प्रश्न कायम आहे. यापूर्वी धान्यपुरवठा बंद झालेल्या सर्व कुटुंबांना सरसकट धान्य मिळणार की पात्रतेची नव्याने तपासणी करून लाभ दिला जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. जिल्हा पुरवठा विभागाचेही शासनाच्या अधिकृत आदेशाकडे लक्ष लागले आहे.

गरजूंच्या ताटातील घास हिरावला जाऊ नये!

अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळणे आवश्यक असले, तरी तांत्रिक चुका, दुबार नोंदी किंवा चुकीच्या माहितीमुळे खऱ्या गरजू कुटुंबांवर अन्याय होता कामा नये. विशेषतः दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांची फेरतपासणी होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांची घोषणा केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष रेशन दुकानापर्यंत पोहोचावी आणि गरजूंच्या घरातील चूल पुन्हा पेटावी, अशी अपेक्षा जिल्ह्यातील वंचित लाभार्थी व्यक्त करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!