देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : एसटी बसमध्ये तिकिटाचे १५ रुपये मागितल्याचा राग आल्याने एका प्रवाशाने महिला वाहकाशी वाद घालत शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना गुरुवारी (दि. १२ नोव्हेंबर) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास आळंदकडील रस्त्यावर घडली. एवढेच नव्हे, तर वरिष्ठांकडे तक्रार करून नोकरी घालविण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महिला वाहकाच्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शारदा विनोद तुपकर (४०, रा. अंढेरा) असे तक्रारदार महिला वाहकाचे नाव असून, ज्ञानेश्वर रमेश खार्डे (रा. आळंद) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारीनुसार, वाहक तुपकर यांनी प्रवाशाकडे तिकिटाचे १५ रुपये मागितले असता, त्याने भाडे केवळ पाच रुपये असल्याचे सांगत उर्वरित पैसे देण्यास विरोध केला. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.
यावेळी आरोपीने आपल्याकडे दिव्यांगत्वाचे कार्ड असल्याचे सांगितले. मात्र, वाहक तुपकर यांनी कार्ड दाखविण्यास सांगितले असता त्याने नकार दिला. उलट ‘वरिष्ठांकडे तक्रार करतो, तुमची नोकरी घालवतो,’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, संबंधित प्रवासी मद्याच्या नशेत असल्याचे जाणवल्याने महिला वाहकाने त्याला बसमधून खाली उतरण्यास सांगितले. याचा राग आल्याने त्याने शिवीगाळ करीत दमदाटी केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, देऊळगाव राजा पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.













