Advertisement Advertisement

बुलढाणा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के! मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात नागरिकांची धावपळ; मध्य प्रदेशातील खरगोन ठरला केंद्रबिंदू….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्ह्यात आज, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून १३ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अचानक जमीन हादरल्याची जाणीव झाल्याने अनेक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

जिल्ह्यातील मलकापूर, जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांतील अनेक गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी नागरिकांना घरातील वस्तू हलल्याचे जाणवल्याने नेमके काय घडले, याबाबत चर्चा सुरू झाली.

प्राप्त माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू मध्य प्रदेशातील खरगोन परिसरात होता. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.५ इतकी नोंदविण्यात आली आहे. या भूकंपाचे धक्के केवळ बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे, तर शेजारील जळगाव जिल्ह्यातील रावेर, भुसावळ आणि यावल परिसरातही जाणवले.

दरम्यान, बुलढाणा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, सुदैवाने या घटनेत जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते. मात्र, जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची नोंद नसल्याने प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!