चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली-जालना महामार्गावर मेरा चौकीजवळ आज, १३ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात रवी भीमराव बोरकर (वय ३९, रा. पुंडलिक नगर, चिखली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेली अडीच वर्षांची चिमुकली मुलगी जखमी झाली. चिखलीहून देऊळगाव राजाच्या दिशेने जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला.
अपघातानंतर घटनास्थळी मदतीसाठी कुणीही पुढे येत नसल्याचे पाहून त्याच मार्गाने जात असलेले अंढेरा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल सिद्धार्थ सोनकांबळे यांनी क्षणाचाही विलंब न करता माणुसकी दाखवली. ड्युटी संपवून घरी जात असताना त्यांनी अपघातग्रस्त चिमुकलीला मदतीचा हात दिला.
वेदांत शालिग्राम चव्हाण यांच्या सोबतीने त्यांनी जखमी चिमुकलीला स्वतःच्या वाहनातून चिखली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे चिमुकलीला वेळीच उपचार मिळण्यास मदत झाली. पुंडलिक नगरचे नगरसेवक दत्ता सुसर यांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी मुलीवर रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत.
एका बाजूला अपघातात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना, दुसऱ्या बाजूला संकटाच्या क्षणी पोलिस कर्मचाऱ्याने दाखवलेली तत्परता आणि माणुसकी परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.















