सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सोयाबीनचे भुस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा भोसा घाटातील रस्त्यावर अचानक अपघात होऊन दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. माऊली अनंतराव दवणे (वय २२) आणि महेश प्रकाश रणवीर (वय २०), दोघेही रा. केहाळ वडगाव, ता. मंठा, जि. जालना अशी मृत तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, केहाळ वडगाव येथील माऊली दवणे हा स्वतःच्या ट्रॅक्टरमधून मित्र महेश रणवीर याच्यासोबत सोयाबीनचे भुस घेऊन धांदरवाडीकडे जात होता. दरम्यान, भोसा घाटातील रस्त्यावर अचानक ट्रॅक्टर पलटी झाले. या अपघातात ट्रॅक्टरमधील दोघेही खाली दबले गेले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
अपघाताची माहिती मिळताच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी तातडीने मदतकार्य करीत ट्रॅक्टर बाजूला करून दोघांनाही बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. तरुणांचा मृत्यू झाल्याचे समजताच घटनास्थळी हळहळ व्यक्त करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. घटनेची बातमी समजताच मृतांच्या नातेवाइकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.
दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसांत एकाच गावातील दोन तरुणांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने केहाळ वडगाव गावावर शोककळा पसरली आहे. अवघ्या २० आणि २२ वर्षांच्या या तरुणांच्या मृत्यूने दोन कुटुंबांचा आधार हरपला असून, गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.














