Advertisement Advertisement

साडेबारा वाजता घर सोडलं, पण माय-लेकरांचा पत्ता लागेना! बायको अन् दोन लेकरं कुठं गेली? गारडगावात खळबळ; पोलिसांत गुन्हा दाखल!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): खामगाव तालुक्यातील गारडगाव येथून तरुण विवाहिता आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. पत्नी आणि दोन्ही मुलांचा शोध घेऊनही ते मिळून न आल्याने पतीने खामगाव ग्रामीण पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीवरून पोलिसांनी १२ नोव्हेंबर रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

गारडगाव येथील माणिक साहेबराव वानखडे (वय ३४) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी आचल (वय २७), मुलगी जयश्री (वय ७) आणि मुलगा हरीष (वय ५) हे ११ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घरातून निघून गेले. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत.

बेपत्ता आचल हिचा रंग सावळा, चेहरा लांबट असून तिने अंगात ऑरेंज रंगाची साडी परिधान केली आहे. मुलगी जयश्री हिच्या अंगात पांढरा शर्ट व आकाशी रंगाचा फ्रॉक, तर मुलगा हरीष याने पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे.

या घटनेप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. पत्नी व दोन्ही मुलांचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!