Advertisement Advertisement

नगर परिषदेचे आदेशच बनावट निघाले!त्याच कागदावर पाच जणांना भूखंड विकले!चिखलीत गुंठेवारीचा बनावट खेळ उघड; पोलिसांत गुन्हा!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली नगर परिषदेचे बनावट गुंठेवारी आदेश तयार करून त्याच्या आधारे चक्क पाच जणांना भूखंडांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नगर परिषदेच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून खरेदीखतांचे व्यवहार करण्यात आल्याने शासनाची तसेच नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नगर परिषदेच्या नगर रचना सहायक कांचन हिरामण राठोड यांच्या तक्रारीवरून सुखदेव रायभान जाधव (रा. चिखली) याच्याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर रचना सहायक कांचन राठोड (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चिखली भाग-१ मधील सर्व्हे क्रमांक १२०/२/० संदर्भात बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला. सुखदेव जाधव याने चिखली नगर परिषदेचा गुंठेवारी आदेश क्रमांक २८३९/२०१२ (दिनांक २४ ऑगस्ट २०१२) आणि जावक क्रमांक २७३०/२०१२ (दिनांक १२ ऑगस्ट २०१२) असे बनावट आदेश तयार केल्याचा आरोप आहे. या कागदपत्रांच्या आधारे सह दुय्यम निबंधक कार्यालय, चिखली येथे खरेदीखताचे व्यवहार करण्यात आले.

विशेष म्हणजे, ११ सप्टेंबर २०२५ रोजी या बनावट गुंठेवारी आदेशाचा वापर करून अहमद खान महेमुद खान, नगमा बी शेख आरिफ, जाहिदा गयासोदीन अहमद सैय्यद, शशिकला प्रल्हाद साबळे आणि लक्ष्मी लक्ष्मण माडुकर या पाच जणांना नोंदणीकृत खरेदीखताद्वारे विक्री करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी नगर परिषद कार्यालयात अर्ज प्राप्त झाल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्यावेळी संबंधित क्रमांकाचे गुंठेवारी आदेश किंवा जावक नोंदी नगर परिषदेतून जारीच झाल्या नसल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर सुखदेव जाधव यांना आपली बाजू मांडण्यासाठी नगर परिषदेकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यांनी आजारी असल्याचे कारण देत २८ मार्च २०२६ रोजी कार्यालयात हजर राहून खुलासा करण्याचे लेखी कळवले; मात्र त्यानंतर ते कार्यालयात आले नाहीत किंवा त्यांनी कोणताही खुलासा सादर केला नाही. अखेर मुख्याधिकारी यांच्या प्राधिकृत पत्रानुसार आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाची परवानगी मिळाल्यानंतर नगर रचना सहायक कांचन राठोड यांनी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३३६(३), ३३८ आणि ३४० अन्वये प्रथम खबर क्रमांक ०८८७ दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक भूषण रामराव गावंडे यांनी गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार कडुबा भास्कर मुंडे करीत आहेत.

नगर परिषदेचे आदेशच बनावट निघाल्याने या व्यवहारांमागील संपूर्ण प्रकरण आता पोलिसांच्या तपासाच्या कक्षेत आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!