सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : महाराष्ट्राच्या समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र पुन्हा एकदा समोर आले असून, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगावजवळ खडकपूर्णा नदीवरील पुलावर भीषण साखळी अपघात घडला. एका भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिल्याने तब्बल २५ ते ३० वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात जवळपास ३० जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, जखमींची अधिकृत संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, खडकपूर्णा नदीवरील पुलावरून वाहने जात असताना एका कंटेनरने पुढील वाहनांना जोरदार धडक दिली. कंटेनरच्या धडकेनंतर एकापाठोपाठ एक वाहने एकमेकांवर आदळत गेली. काही क्षणांतच महामार्गावर वाहनांचा मोठा खच पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. या अपघातात अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली.
अपघातस्थळी बचावकार्य; जखमींना रुग्णालयात हलवले!
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयांत उपचारासाठी हलवण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, अपघाताची व्याप्ती मोठी असल्याने बचावकार्य आणि मदतकार्याला वेग देण्यात आला.
समृद्धीवर वाहतुकीचा खोळंबा; अपघाताचे कारण गुलदस्त्यात!
एकाच ठिकाणी २५ ते ३० वाहने अपघातग्रस्त झाल्याने समृद्धी महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी यंत्रणांची धावपळ सुरू झाली. कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले की अन्य काही कारणामुळे हा भीषण अपघात घडला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.
दरम्यान, समृद्धी महामार्गावरील या भीषण साखळी अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जखमींची अधिकृत संख्या आणि अपघाताचा सविस्तर तपशील समोर येण्याची प्रतीक्षा आहे.
टीप : जखमींची संख्या व अपघाताचा तपशील प्राथमिक माहितीनुसार देण्यात आला आहे.














