Advertisement Advertisement

रक्षा विसर्जनासाठी घराबाहेर पडल्या, पण परतल्याच नाहीत! गतिरोधकावर दुचाकी उसळली अन् ट्रॅक्टरच्या चाकाखाली ७० वर्षीय महिलेचा अंत!

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर तालुक्यातील भालेगाव येथे इंस्टाग्राम स्टोरीवरून झालेल्या वादात निलेश निकम यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी भालेगाव येथे येत असलेल्या ७० वर्षीय महिलेचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास भालेगावजवळ घडली. या घटनेमुळे भालेगाव आणि किन्ही नाईक परिसरात शोककळा पसरली आहे.

मेहकर तालुक्यातील भालेगाव येथे १० नोव्हेंबर रोजी इंस्टाग्राम स्टोरी ठेवण्यावरून वाद झाला होता. या वादातून निलेश अशोक निकम यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर १३ नोव्हेंबर रोजी त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी चिखली तालुक्यातील किन्ही नाईक येथील सत्यभामाबाई तेजराव जाधव (वय ७०) या मोटारसायकलने भालेगावकडे येत होत्या.

दरम्यान, गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गतिरोधकावर मोटारसायकल अचानक उसळली. या मोटारसायकलवर चालकासह दोन महिला प्रवास करीत होत्या. मोटारसायकल उसळल्याने सत्यभामाबाई जाधव यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर पडल्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली त्या आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्यांच्यासोबत असलेली ४५ वर्षीय महिला सुदैवाने बचावली.

मृत सत्यभामाबाई जाधव या भालेगाव येथील मृतक निलेश अशोक निकम यांच्या नात्याने मावशी लागत असल्याची माहिती घटनास्थळी उपस्थितांनी दिली. एकीकडे निलेश निकम यांच्या मृत्यूच्या दुःखातून कुटुंबीय सावरत असतानाच रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या नातेवाईक महिलेचाही अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!