Advertisement Advertisement

अतिवृष्टीने हैराण शेतकऱ्यांना मोठा दिलासा! बुलढाण्याच्या ७,६५८ शेतकऱ्यांसाठी १० कोटी ७८ लाखांचा निधी मंजूर! ५,४८९ हेक्टरवरील पीक नुकसानीची भरपाई; मदत थेट खात्यात, जुन्या कर्जासाठी रक्कम वळती न करण्याचे बँकांना आदेश…

बुलढाणा (जिमाका:बुलडाणा कव्हरेज न्युज) : जून आणि जुलै २०२६ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूरस्थिती, चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातील १० कोटी ७८ लाख ५७ हजार रुपये एकट्या बुलढाणा जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहेत.

या निधीचा लाभ जिल्ह्यातील ७ हजार ६५८ बाधित शेतकऱ्यांना मिळणार असून, ५ हजार ४८९.९१ हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानीसाठी ही मदत देण्यात येणार आहे. मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली.

बुलढाण्याच्या शेतकऱ्यांच्या पदरात सर्वाधिक मदत…..

अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा या चार जिल्ह्यांतील एकूण ९ हजार ६८३ बाधित शेतकऱ्यांसाठी १३ कोटी ८० लाख ७४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या वाट्याला १० कोटी ७८ लाख ५७ हजार रुपयांची मदत आली आहे.

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील विविध भागांतील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना या मदतीमुळे दिलासा मिळणार आहे.

शासनस्तरावर पाठपुरावा…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मंजूर झालेला निधी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी आधार ठरेल, असे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यास शासन कटिबद्ध असून, शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मदतीची रक्कम थेट खात्यात….

बाधित शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेली मदत डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना मिळणारी ही मदत त्यांच्या जुन्या कर्जाच्या परतफेडीसाठी किंवा कर्जवसुलीसाठी वळती करून घेऊ नये, अशा कडक सूचना सर्व बँकांना देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले आहेत.

त्यामुळे अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आता शासनाच्या मदतीची प्रतीक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!