Advertisement Advertisement

पोरीला शिकायला शहरात पाठवलं… फोन बंद झाला अन् बापाची झोप उडाली! वर्षभर शोध घेऊनही ठावठिकाणा नाही; कथित प्रियकरावर अखेर गुन्हा!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी घरापासून दूर गेलेली २० वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाली. मुलगी आणि तिच्यासोबत असलेला तरुण दोघांचाही वर्षभरापासून ठावठिकाणा लागत नसल्याने चिखलीतील एका शेतकरी पित्याची चिंता दिवसेंदिवस वाढत गेली. मुलीच्या शोधासाठी पोलीस ठाण्यापासून थेट उच्च न्यायालयापर्यंत धाव घेतल्यानंतर अखेर तिच्या कथित प्रियकराविरुद्ध फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याची मुलगी स्पर्धा परीक्षेच्या क्लाससाठी मार्च २०२४ पासून छत्रपती संभाजीनगर शहरातील नूतन कॉलनी परिसरातील एका हॉस्टेलमध्ये राहत होती. सुरुवातीच्या काळात ती आई-वडिलांशी नियमित फोनवर संपर्कात होती. मात्र २७ मे २०२४ रोजी रात्री सुमारे ९ वाजता झालेला फोन हा कुटुंबीयांशी तिचा शेवटचा नियमित संपर्क ठरला. त्यानंतर तिचा मोबाईल बंद येऊ लागला.

कुटुंबीयांनी हॉस्टेलमध्ये चौकशी केली असता ती २६ मे रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता हॉस्टेलमधून बाहेर गेल्याची माहिती मिळाली. मात्र त्यानंतर ती चिखलीतील घरीही परतली नव्हती. त्यामुळे चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी छत्रपती संभाजीनगर येथे धाव घेत तिच्या मैत्रिणी, हॉस्टेल तसेच परिचितांकडे चौकशी करून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

अखेर क्रांती चौक पोलीस ठाण्यात तरुणी हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांकडून शोध सुरू असतानाच एका मैत्रिणीकडून रोहित राजपूत नावाचा तिचा मित्र तिला काहीतरी आमिष दाखवून घेऊन गेल्याची माहिती मिळाल्याचा दावा तिच्या वडिलांनी केला. त्यानंतर रोहित राजपूतचाही शोध घेण्यात आला; मात्र त्याचाही ठोस ठावठिकाणा लागला नाही.

मुलगी आणि रोहित दोघेही सापडत नसल्याने अखेर २५ सप्टेंबर २०२५ रोजी चिखलीतील या पित्याने छत्रपती संभाजीनगर खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. या याचिकेत रोहित राजपूतसह त्याच्या सहा नातेवाइकांवर संशय व्यक्त करण्यात आला. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यानही संबंधित व्यक्ती हजर राहत नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, मुलीला फूस लावून पळवून नेऊन कुठेतरी डांबून ठेवल्याचा संशय व्यक्त करत तिच्या वडिलांनी २५ ऑगस्ट २०२६ रोजी पुन्हा क्रांती चौक पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रोहित राजपूतविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणामुळे तरुणी नेमकी कुठे आहे, तिच्यासोबत काय घडले आणि रोहित राजपूतचा ठावठिकाणा का लागला नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुलीला आमिष दाखवून तिचे अपहरण करून तिला कुठेतरी डांबून ठेवल्याचा संशय हा तक्रारदार पित्याने व्यक्त केला असून, या आरोपांची सत्यता पोलिसांच्या तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

वर्षभरापेक्षा अधिक काळ आपल्या मुलीचा शोध घेत असलेल्या या शेतकरी पित्याला अखेर न्याय मिळेल का? बेपत्ता तरुणी सुखरूप सापडणार का? आणि या संपूर्ण प्रकरणामागचे नेमके सत्य काय आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!