मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आयटीआय कॉलेजला जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेल्याचा आणि तिच्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी २१ वर्षीय तरुणाविरुद्ध पोक्सो कायदा आणि अॅट्रॉसिटी कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडे दाखल फिर्यादीनुसार, २७ ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी आयटीआय कॉलेजकडे जात होती. यावेळी तळणी येथील ज्ञानेश्वर संजय तायडे (वय २१) याने दुचाकीवरून तिचा पाठलाग केल्याचा आरोप आहे.
आरोपीने मुलीसमोर दुचाकी थांबवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लग्न करण्याबाबत बोलत तिचा हात पकडून तिला बळजबरीने दुचाकीवर बसविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर आरोपीने तिला मोताळा-दिडोळा शिवाराच्या मार्गाने नळगंगा धरण परिसरात नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तेथे तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी ज्ञानेश्वर तायडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १३७(२), ७४, ७८, ३५१(२), पोक्सो कायद्यातील कलम ८ व १२ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, घटनेतील आरोपांची कायदेशीर प्रक्रिया व तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे.













