शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील रोकडिया नगर परिसरात १० वर्षीय बालिकेसोबत अश्लील गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून २५ वर्षीय तरुणाविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पोक्सो कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पीडित बालिका घराबाहेरील अंगणात वाळलेले कपडे आणण्यासाठी गेली होती. यावेळी शेजारी राहणाऱ्या आरोपीने तिला हाताने इशारा करून जवळ बोलावले. त्यानंतर काही वेळ तिच्याशी बोलून आरोपीने अश्लील गैरवर्तन केल्याचा आरोप बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेनंतर बालिकेच्या आईने २५ ऑगस्ट रोजी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शिवम गजानन तायडे (वय २५, रा. रोकडिया नगर, शेगाव) याच्याविरुद्ध बीएनएस कलम ७५, ७९ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बारिंगे करीत असून, पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.














