बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय ‘सहकार’ पॅनलने जोरदार मुसंडी मारत २१ पैकी तब्बल १९ जागांवर विजय मिळवला आहे. या दणदणीत विजयामुळे बँकेवरील ‘सहकार’ पॅनलचे वर्चस्व स्पष्ट झाले असून, आता या विजयाचा पुढचा टप्पा अध्यक्षपदाच्या निवडीचा आहे. त्यामुळे बँकेच्या अध्यक्षपदाची खुर्ची कुणाच्या वाट्याला जाते, याची उत्सुकता जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
अध्यक्षपदासाठी डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याची चर्चा आहे. निवडणुकीपूर्वी बिनविरोध निवडींचे राजकीय गणित जुळवून आणण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिल्याने अध्यक्षपदासाठी त्यांच्याच नावाला पसंती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र अंतिम निर्णय ‘सहकार’ पॅनलमधील नेत्यांच्या बैठका आणि राजकीय समीकरणांवर अवलंबून राहणार आहे.
विशेष म्हणजे ‘सहकार’ पॅनलमध्ये विविध राजकीय विचारांचे नेते एकत्र आले आहेत. निवडणुकीच्या मैदानात एकत्रित ताकद दाखवत १९ जागा जिंकण्यात पॅनलला यश आले असले, तरी अध्यक्षपदाच्या निवडीवेळी प्रत्येक नेत्याचे राजकीय गणित वेगळे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीपुरती झालेली ही एकजूट अध्यक्षपदाच्या निवडीपर्यंत तशीच टिकते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अध्यक्षपदासाठी कोणते समीकरण आकार घेते, यावर जिल्ह्यातील आगामी राजकीय हालचालींची दिशाही ठरण्याची शक्यता आहे. निवडणुकीत मोठा विजय मिळविल्यानंतर आता सत्तेतील वाटपाचा खरा कस लागणार असून, पॅनलमधील नेत्यांमध्ये अध्यक्षपदाबाबत चर्चा आणि राजकीय खलबते सुरू झाल्याचे चित्र आहे.
त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक जिंकून ‘सहकार’ पॅनलने पहिला डाव तर जिंकला; पण ‘गुलाल उधळला, आता अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात?’ हा प्रश्न सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. अध्यक्षपदासाठी अखेर कोणाचे नाव निश्चित होते आणि कोणते राजकीय समीकरण जुळते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
















