Advertisement Advertisement

अंगणवाडी ताईंच्या माथी अतिरिक्त कामांचा बोजा; शासनाचा आदेश धाब्यावर? योजनाबाह्य कामांमुळे कर्मचाऱ्यांत नाराजी….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बालकांचे आरोग्य, पोषण आणि पूर्वशालेय शिक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांवर विविध विभागांची अतिरिक्त कामे लादली जात असल्याचा आरोप होत आहे. शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेव्यतिरिक्त कोणतेही काम देऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले असतानाही स्थानिक पातळीवर योजनाबाह्य कामे करून घेतली जात असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

अंगणवाडी केंद्रांमध्ये ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसह गर्भवती व स्तनदा मातांना पूरक पोषण आहार देणे, पूर्वशालेय शिक्षण, आरोग्य तपासणी, लसीकरणासाठी सहकार्य तसेच पोषण व आरोग्यविषयक मार्गदर्शन करणे, अशी महत्त्वाची जबाबदारी अंगणवाडी सेविका व मदतनीस पार पाडतात. मात्र, या नियमित कामांव्यतिरिक्त आरोग्य, शिक्षण, पंचायत, निवडणूक तसेच विविध सर्वेक्षणांची कामेही त्यांच्यावर सोपविली जात असल्याने मूळ कामकाजावर परिणाम होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

महिला व बालकल्याण विभागाच्या निर्देशांनुसार, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेव्यतिरिक्त कोणतेही काम परस्पर देऊ नये. योजनाबाह्य काम सोपवायचे असल्यास शासनाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असतानाही स्थानिक पातळीवर अधिकारी दबाव टाकून विविध कामे करून घेत असल्याचा आरोप आयटककडून करण्यात आला आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अल्प मानधन मिळत असताना त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्यांचा भार टाकला जात असल्याबद्दलही नाराजी व्यक्त होत आहे. शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच निवडणूक विभागातील नियमित कर्मचाऱ्यांकडून नाकारली जाणारी कामेही अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे सोपविली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अतिरिक्त कामे करून घेतली जात असतील, तर त्यांना वेतनश्रेणी का लागू केली जात नाही? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

याबाबत आयटकच्या जिल्हाध्यक्ष शशिकला मौर्य यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विभागाने निश्चित केलेल्या कामांव्यतिरिक्त इतर कामे देऊ नयेत, अशी मागणी केली आहे. स्थानिक अधिकारी दबाव टाकून योजनाबाह्य कामे करून घेत असल्याचे निदर्शनास येत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, शासनाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!