Advertisement Advertisement

रात्री शेतात घुसले, दांपत्याला धमकावलं, पैसे-मोबाईल लुटला अन् तरुणीवर अत्याचार; अखेर दोन नराधम पोलिसांच्या जाळ्यात! सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण अन् गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबीची कारवाई; चोरीचा मोबाइल व विळा जप्त…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुधलगाव शिवारात दांपत्याला विळ्याचा धाक दाखवून लुटल्यानंतर १९ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणाचा अखेर स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला विळा आणि चोरीचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

१७ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री घडला प्रकार…..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलैच्या रात्री दुधलगाव शिवारातील शेतातील घरात दांपत्य झोपले असताना दोन अज्ञात आरोपींनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. विळ्याचा धाक दाखवत आरोपींनी दांपत्याकडील सुमारे ६०० रुपये रोख रक्कम आणि मोबाइल हिसकावून घेतला. त्यानंतर दांपत्याला शेतात नेण्यात आले. तेथे विवाहितेवर लैंगिक अत्याचार करून आरोपी फरार झाले.

या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. आरोपींची ओळख पटत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.

एसपी तांबे यांनी घेतली तपासाची सूत्रे….

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला दिशा दिली. स्थानिक गुन्हे शाखेला स्वतंत्र पथक तयार करून समांतर तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. विविध ठिकाणी चौकशी, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान संशयितांच्या डीएनए नमुन्यांचीही तपासणी करण्यात आली.

मध्य प्रदेशातील आरोपींचा काढला माग….

सातत्यपूर्ण तपासानंतर पोलिसांना आरोपींची ओळख पटविण्यात यश आले. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील दापोरा येथील २२ वर्षीय राकेश महेंद्रसिंग भिलाला तसेच मलकापूर येथील कुंड फाटा परिसरातील २२ वर्षीय जामसिंग रोशन भिलाला यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन्ही आरोपींना २६ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. चौकशीत त्यांच्याकडून गुन्ह्याशी संबंधित माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच गुन्ह्यात चोरीस गेलेला मोबाइल आणि वापरण्यात आलेला विळा पोलिसांनी जप्त केला आहे.

एलसीबीकडून पहिल्या मोठ्या गुन्ह्याची उकल

पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार स्वीकारल्यानंतर उकल झालेला हा पहिला मोठा गुन्हा असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाचे कौतुक होत आहे.

पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माछरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, अविनाश जायभाये यांच्यासह एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.

गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्याचा तपास तांत्रिक पद्धतीने पुढे नेत आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आल्याने नागरिकांमधून पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!