बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यातील बहुतांश भागात सध्या सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडॉप्टेरा लिटुरा), उंट अळी, घाटे अळी आणि केसाळ अळी यांचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाने केले आहे.
पाने खाणाऱ्या अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उन्हाळ्यात खोल नांगरणी करून जमिनीतील कोष नष्ट करणे, तसेच मुख्य सोयाबीन पिकाभोवती एरंडी किंवा सूर्यफुलाची एक ओळ सापळा पीक म्हणून लावणे फायदेशीर ठरते. शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करून अंड्यांचे पुंजके तसेच समूहाने आढळणाऱ्या लहान अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. शेत तणमुक्त ठेवण्यासोबत संतुलित खत व्यवस्थापन करणेही महत्त्वाचे आहे.
फेरोमोन सापळे, पक्षीथांबे आणि जैविक नियंत्रणाचा वापर
पाने खाणाऱ्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी फेरोमोन सापळे लावून त्यामध्ये स्पोडोल्युअर किंवा हेलील्युअर प्रलोभकाचा वापर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. भक्षक पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रति एकर ८ ते १० पक्षीथांबे उभारावेत.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टिन (१० हजार पीपीएम) ५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करता येते. अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास जैविक नियंत्रणासाठी बिव्हेरिया बॅसियाना ५ मिली प्रति लिटर, एस.एल.एन.पी.व्ही. (५०० एल.ई.) ५ मिली प्रति लिटर किंवा मेटारायझियम रिलायी ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करण्याची शिफारस आहे.
आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यासच रासायनिक फवारणी
शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच रासायनिक कीड नियंत्रणाचा वापर करावा. कामगंध सापळ्यात सलग २ ते ३ दिवस प्रति सापळा ८ ते १० नर पतंग आढळल्यास किंवा फुलोऱ्यापूर्वी प्रति मीटर ओळीत १० तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळ्या आढळल्यास कीड नियंत्रणाची उपाययोजना करावी.
शेंगा भरण्याच्या अवस्थेत प्रति मीटर ओळीत ३ उंट अळ्या किंवा ५ घाटे अळ्या आढळल्यास कीटकनाशकाची फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
यासाठी क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल १८.५ टक्के एससी १५० मिली प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करता येते. पर्याय म्हणून इमामेक्टिन बेंझोएट १.९० टक्के ईसी ४२५ मिली प्रति हेक्टर, फ्लुबेंडायामाइड २० टक्के डब्ल्यूजी २५० ते ३०० ग्रॅम प्रति हेक्टर किंवा फ्लुबेंडायामाइड ३९.३५ टक्के डब्ल्यू डब्ल्यू एससी १५० मिली प्रति हेक्टर यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करता येईल.
इतर किडींचा प्रादुर्भाव असल्यास उपाययोजना
ज्या शेतात पाने खाणाऱ्या अळ्यांसोबत पांढरी माशी आणि खोड कीड (गर्डल बीटल) यांचा एकाच वेळी प्रादुर्भाव आढळतो, अशा ठिकाणी थायामेथोक्झाम + लॅम्ब्डा सायहॅलोथ्रिन १२५ मिली प्रति हेक्टर किंवा बेटासायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड ३५० मिली प्रति हेक्टर या मिश्र कीटकनाशकांची फवारणी करता येईल.
याशिवाय क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल ०९.३० टक्के + लॅम्ब्डा-सायहॅलोथ्रिन ०४.६० टक्के झेडसी २०० मिली प्रति हेक्टर किंवा इंडॉक्साकार्ब १५.८० टक्के ईसी ३३३ मिली प्रति हेक्टर यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांना पिकाची नियमित पाहणी करून आर्थिक नुकसान पातळीच्या आधारेच कीड नियंत्रणाच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. कीटकनाशकांची फवारणी करताना शिफारस केलेले प्रमाण, लेबलवरील सूचना आणि सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.
















