बुलढाणा : (बुलडाणा कव्हरेज न्युज) शेतीच्या वादातून सख्ख्या काकाचा धारदार चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी पुतण्या समाधान पंडित जाधव याला बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून, दंडाच्या रकमेपैकी ८ हजार रुपये मयताच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांनी दिले.
शेतातच काकावर चाकूने सपासप वार….
बुलढाणा तालुक्यातील धाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुंबेफळ येथील गट क्रमांक २६ मधील शेतात २९ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता ही घटना घडली होती. शेषराव रामा जाधव हे त्यांचा मुलगा विलास याच्यासोबत शेतात काम करीत होते. यावेळी शेषराव यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून विलास त्यांच्या मदतीसाठी धावला.
त्यावेळी दादाराव पंडित जाधव आणि आशा साईनाथ बडगुजर यांनी शेषराव यांना पकडून ठेवले होते, तर समाधान पंडित जाधव याने धारदार चाकूने शेषराव यांच्या पोटावर, छातीवर आणि दोन्ही पायांवर वार केल्याचे विलासने पाहिले. विलासने आरडाओरड केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. गंभीर जखमी अवस्थेत शेषराव जाधव रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांचा या घटनेत मृत्यू झाला.
आरोपीने स्वतः पोलिस ठाण्यात दिली कबुली…
घटनेनंतर समाधान जाधव स्वतः धाड पोलिस ठाण्यात गेला आणि गुन्ह्याची कबुली दिल्याचे तपासात समोर आले. तसेच आरोपीने रक्ताने माखलेला शर्ट जाळण्यासाठी त्याची आई आनंदाबाई जाधव यांच्याकडे दिला होता. हा शर्ट शेताच्या बांधावर जाळल्याचे पोलिस तपासात आढळून आले.
मयताचे पुत्र विलास जाधव यांच्या फिर्यादीवरून धाड पोलिसांनी गुन्हा क्रमांक २६९/२०२२ अन्वये भादंवि कलम ३०२, २०१ व सहकलम ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान आरोपींना अटक करून गुन्ह्यात वापरलेला चाकू तसेच इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा मुद्देमाल रासायनिक विश्लेषणासाठी अमरावती येथे पाठविण्यात आला होता.
रक्ताचे नमुने ठरले महत्त्वाचे पुरावे…..
रासायनिक विश्लेषणाच्या अहवालात आरोपीच्या कपड्यांवर तसेच गुन्ह्यात वापरलेल्या चाकूवर मयत शेषराव जाधव यांचेच रक्त असल्याचे निष्पन्न झाले. न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, पंच, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सरकार पक्षाने सादर केलेले भक्कम पुरावे विचारात घेत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांनी समाधान पंडित जाधव याला भादंवि कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
दरम्यान, याच प्रकरणातील आरोपी दादाराव जाधव, आशाबाई बडगुजर आणि आनंदीबाई जाधव यांना संशयाचा फायदा देत न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील वसंत भटकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. कोर्ट पैरवी म्हणून पीएसआय रमेश चव्हाण यांनी सहकार्य केले.













