साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :मोहरम मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साखरखेर्डा येथे प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) २०२३ च्या कलम १६३ (३) अन्वये संचारबंदी लागू केली आहे. २६ जून रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून २७ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हा आदेश लागू असून शहरात सुमारे १५० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
. जाहिरात 👆
मागील वर्षी (२०२४) मोहरम मिरवणुकीदरम्यान दोन समाजांमध्ये झालेल्या दगडफेक आणि वादाच्या घटनेनंतर ३४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर यंदा पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.
काही दिवसांपूर्वी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती. यावेळी ठाणेदार गजानन करेवाड यांनी सर्व समाजातील युवकांनी पुढाकार घेऊन सामाजिक सलोखा कायम ठेवावा, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि मिरवणुकीदरम्यान शांतता राखावी, असे आवाहन केले होते. सोशल मीडियावरही विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून अफवा पसरविणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यंदाची मोहरम मिरवणूक जाफराबाद मोहल्ला, गुजरी चौक, अग्रेशन चौक, दगडी मशीद, एसबीआय बँक, बसस्थानक, गादी कारखाना, गणपती चौक, रोहीलपुरा, माळीपुरा मार्गे भोगावती नदीपर्यंत जाणार आहे. या मार्गालगतच्या संवेदनशील भागांमध्ये दोन किंवा अधिक व्यक्तींनी विनाकारण एकत्र फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.
तसेच २०२१ आणि २०२४ मधील दंगलीतील गुन्हे दाखल आरोपींना दोन दिवस गावात प्रवेशबंदीचे आदेश उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी जारी केले आहेत.
पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चार अधिकारी, एक एसआरपी प्लाटून, एक एसआरपी सेक्शन, ५० हून अधिक पोलीस कर्मचारी, ४० होमगार्ड आणि इतर मिळून सुमारे १५० जणांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहेत.
शाळा आणि महाविद्यालयांना या जमावबंदी आदेशातून वगळण्यात आले असून, शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदार गजानन करेवाड यांनी केले आहे.















